क्रिएटिव्ह करिअर्स गायडन्स सेमिनारचे रत्नागिरीत आयोजन
रत्नागिरी, 2 जून (हिं.स.) । स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे न राहता कौशल्याधारित शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थिनी, महिला आणि पालकांमध्ये “शिक
क्रिएटिव्ह करिअर्स गायडन्स सेमिनारचे रत्नागिरीत आयोजन


रत्नागिरी, 2 जून (हिं.स.) । स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे न राहता कौशल्याधारित शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थिनी, महिला आणि पालकांमध्ये “शिक्षणासोबत करिअरच्या नव्या संधी कोणत्या?” याबाबत मोठी उत्सुकता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI), रत्नागिरी यांच्या वतीने विद्यार्थिनी, पालक तसेच महिला वर्गासाठी “Creative Careers मार्गदर्शन सेमिनार २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.

हा सेमिनार रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे.

१० वी, १२ वी नंतर तसेच पदवी शिक्षण घेत असताना विद्यार्थिनींनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित व व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची निवड करणे काळाची गरज बनली आहे. आज फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, ब्युटी अँड वेलनेस, पर्यटन व हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. ग्रामीण भागातदेखील लघुउद्योग, होम बेस्ड व्यवसाय, फ्रीलान्सिंग, सलून, बुटीक, इंटिरियर कन्सल्टन्सी, पर्यटन सेवा यांसारख्या क्षेत्रांना मोठी मागणी निर्माण होत आहे. त्यामुळे अशा अभ्यासक्रमांची माहिती, करिअर संधी, आवश्यक कौशल्ये आणि भविष्यातील व्यवसायाच्या दिशा विद्यार्थिनी व पालकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुणे येथे स्थापन केलेली देशातील अग्रगण्य महिला शिक्षण संस्था असून १३० वर्षांहून अधिक काळ महिला शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या पुणे, वाई, सातारा, नागपूर आणि रत्नागिरीसह विविध ठिकाणी शाखा कार्यरत असून ७७ हून अधिक विविध शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांद्वारे हजारो विद्यार्थिनींना शिक्षण व करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

या सेमिनारमध्ये पुणे व रत्नागिरी येथील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून त्यामध्ये शिवानी अरसूल (फॅशन डिझाईन तज्ज्ञ), प्राजक्ता शिंदे (इंटिरियर डिझाईन तज्ज्ञ), भाग्यश्री शिंदे (ब्युटी अँड वेलनेस तज्ज्ञ) तसेच दिशा सोळंकी, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, ग्रीनलीफ रिसॉर्ट, गणपतीपुळे (हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट तज्ज्ञ) यांचा समावेश आहे.

सेमिनारमध्ये विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडताना आवश्यक माहिती, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योग क्षेत्रातील बदल, कौशल्य विकास, तसेच आधुनिक व्यवसाय संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गृहिणी व नोकरदार महिलांनाही आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा कौशल्याधारित उपक्रम सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

या उपक्रमाला विद्यार्थिनी, पालक तसेच सर्व महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था रत्नागिरी प्रकल्प समन्वयक श्री. स्वप्नील सावंत यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी : BKVTI, नलावडे कॉम्प्लेक्स, मारुती मंदिर येथे प्रत्यक्ष अथवा ७४९९८२१३६९ या क्रमांकावर संपर्क करावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande