
लातूर, 02 जून (हिं.स.) : जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथील 7 ते 8 शेतकऱ्यांनी टि.एस. विंड पॉवर डे. कंपनीविरोधात गंभीर आरोप करत जळकोट तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. कंपनीने करार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी न्याय व ठरलेले भाडे मिळावे, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2025 मध्ये कंपनीचे मॅनेजर जाकीर शेख यांनी त्यांच्याशी संपर्क साधून 28 वर्षांसाठी सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेतत्त्वावर घेण्याचा करार केला होता. हा करार नोंदणी कार्यालयात रीतसर नोंदवण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार 2025-26 या वर्षाचे भाडे चेकद्वारे देण्यात आले होते.
त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी जमिनीवरील झाडे तोडून जमीन सपाट केली आणि करारानुसार भाडे नियमित मिळेल असे आश्वासन दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र 2026-27 चे भाडे मिळवण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही रक्कम मिळाली नाही, असा आरोप आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून आधार, पॅन कार्ड, बँक पासबुक यांसह आवश्यक कागदपत्रे घेण्यात आली होती, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र 20 मे 2026 रोजी कंपनीच्या कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना मॅनेजर जाकीर शेख उपस्थित नसल्याचे आढळले.
शेतकऱ्यांनी फोनवर संपर्क साधला असता, आता पैसे देणार नाही, तुम्हाला लीजची गरज नाही, करार रद्द करा,” असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis