
अमरावती, 2 जून (हिं.स.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकूण उमेदवारांची संख्या पाचवर पोहोचली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार असून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 4 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात 25 मे ते 1 जून या कालावधीत नामनिर्देशन प्रक्रिया पार पडली. या कालावधीत इच्छुकांकडून एकूण 74 नामांकन अर्ज उचलण्यात आले. मात्र प्रत्यक्षात केवळ पाच उमेदवारांनीच निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.सोमवारी नामांकन प्रक्रियेच्या अंतिम दिवशी महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटे, वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा, तसेच अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया आणि प्रशांत महल्ले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.यापूर्वी शनिवारी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांनी आपला नामांकन अर्ज सादर केला होता.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सर्व अर्जांची छाननी करण्यात येणार असून त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी असेल.एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी नामांकन मागे घेण्याच्या मुदतीनंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोणता उमेदवार माघार घेतो आणि अंतिम सामना कोणामध्ये रंगतो, याकडे राजकीय वर्तुळासह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी