
अमरावती, 2 जून (हिं.स.) : राज्य शासनाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील चार बसस्थानकांनी उल्लेखनीय कामगिरी करत मानाचे स्थान पटकाविले आहे. ब गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय आणि चांदूर बाजारने तृतीय क्रमांक मिळविला असून, क गटात अंजनगाव सुर्जी बसस्थानकाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानकांची स्वच्छता, सुविधा, देखभाल आणि प्रवासी सेवांच्या आधारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील आठही बसस्थानकांची जिल्ह्याबाहेरील स्वतंत्र पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. जाहीर झालेल्या निकालात अमरावती जिल्ह्यातील चार बसस्थानकांनी राज्यस्तरावर यश संपादन केले.
एसटीच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त गौरव
सोमवारी एसटी महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुरस्कारप्राप्त बसस्थानकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलांगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता राहुल मोडक, सांख्यिकी अधिकारी नितीन देशमुख, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार, उपयंत्र अभियंता विजय वाकोडे आणि विभागीय अभियंता (विद्युत) वर्षा गायकवाड उपस्थित होते.
12 कर्मचाऱ्यांना ‘लालपरी गौरवरत्न पुरस्कार’
प्रवासी सेवेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांना यावेळी ‘लालपरी गौरवरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये अनिल गणोरकर, शब्बीर हुसेन सफदर हुसेन, व्ही. पी. क्षीरसागर, राजू चव्हाण, गणेश दवेरे, ए. एम. अहमद, आय. यू. खान, सुधीर शिगोटे, गणेश बझर, सुनील बोरडे, संजय लांडे आणि सचिन पिगळे यांचा समावेश आहे.
अपघातमुक्त सेवेसाठी चालकांचा विशेष सन्मान
तब्बल
25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सय्यद मकसूद सय्यद मकतुम (बडनेरा), मसूद खान हसन खान (परतवाडा), गजेंद्र देशमुख (चांदूर रेल्वे), रविंद्र नवघरे (दर्यापूर), प्रकाश डहाके (चांदूर बाजार) आणि दिवाकर गौरकर (विभागीय कार्यालय) यांचा समावेश आहे.
तसेच एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातविरहित सेवा देणाऱ्या सात चालकांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये उमेश रामटेके, कपिल अमृतकर, प्रविण मानकर, अविनाश ढवळे, देवेंद्र देवळेकर, निसार अहमद मजहर मिया आणि सचिन चौधरी यांचा समावेश आहे.
या यशामुळे अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांच्या स्वच्छता व प्रवासी सेवा व्यवस्थापनाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी