
परभणी, 2 जून (हिं.स.) : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2026’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 4 मधील कल्याण नगर परिसरात निर्माण झालेली मोठी कचराकुंडी हटवून त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि सुशोभीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसराला स्वच्छ आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.
ही मोहीम महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली.
नगरसेविका तथा माजी महापौर मीनाताई वरपूडकर, नगरसेवक रितेश जैन, नगरसेविका गिरीजा आजेगांवकर, गणेश उर्फ बबलू टाक, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे आणि विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
कचराकुंडी हटवून वृक्षारोपण
स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून संबंधित कचराकुंडी बंद करण्यात आली. त्यानंतर त्या जागेवर वृक्षारोपण करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.
नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन
यावेळी महापौर सय्यद इकबाल आणि उपमहापौर गणेश देशमुख यांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. घरातील कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीतच टाकावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या सहभागातूनच परभणी शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आदर्श शहर म्हणून विकसित होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास शहर समन्वयक तुराब खान, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुर्हा, मुकादम जय मकरंद, उबाळे, तात्या, सोनू जोगदंड, रवी उबाळे, मिलिंद उबाळे, रेखा भराडे, सरूबाई दुधाते तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis