परभणी जिल्ह्यात मान्सूनपूर्व आरोग्य तयारीला गती; आरोग्य यंत्रणा 24x7 सतर्क राहणार
परभणी, 2 जून (हिं.स.) : जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत आज आरोग्य सभापती वैशाली पंकज आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विषय समितीची बैठक पार पडली. बैठकीत मान्सूनपूर्व आरोग्य विभागाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकार
आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना -जि. प. आरोग्य समितीची मान्सूनपूर्व तयारी बैठक


परभणी, 2 जून (हिं.स.) : जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत आज आरोग्य सभापती वैशाली पंकज आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विषय समितीची बैठक पार पडली. बैठकीत मान्सूनपूर्व आरोग्य विभागाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी जिल्ह्यातील 830 गावांपैकी 244 गावे नदीकाठची असून त्यापैकी 54 गावे जोखीमग्रस्त असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी 24 तास मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण पथक सक्रिय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

साथरोग नियंत्रणासाठी 37 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. अपेक्षित प्रसूती मातांची यादी अद्ययावत ठेवणे आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

आरोग्य सभापती वैशाली आंबेगावकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णसेवेचे वेळापत्रक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले. पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखणे, रुग्णवाहिका उपलब्ध ठेवणे आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग व क्षयरोग वैद्यकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, कक्ष प्रमुख तसेच आरोग्य विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.

मान्सून काळात संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande