शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडात जड-अवजड वाहनांना वाहतूक बंदी
रायगड, 02 जून (हिं.स.)। किल्ले रायगड येथे ५ व ६ जून २०२६ रोजी होणाऱ्या भव्य श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार दि. ५
Heavy-vehicles-banned-in-Raiga


रायगड, 02 जून (हिं.स.)। किल्ले रायगड येथे ५ व ६ जून २०२६ रोजी होणाऱ्या भव्य श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार दि. ५ जून रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते दि. ६ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा-नागोठणे ते कशेडी घाट या मार्गासह माणगाव-निजामपूर-पाचाड-रायगड किल्ला, माणगाव-ढालघर फाटा-पाचाड-रायगड किल्ला आणि महाड-नातेखिंड-पाचाड-रायगड किल्ला या मार्गांवर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि राज्याच्या विविध भागांतून लाखो शिवभक्त स्वतःच्या वाहनांनी रायगडावर दाखल होण्याची अपेक्षा आहे. तसेच सोहळ्याच्या आयोजनासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक आणि शासकीय यंत्रणांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर आणि रायगडकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुखकर व्हावा तसेच सोहळ्यादरम्यान कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ही वाहतूक बंदी लागू करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि अग्निशमन दलाची वाहने यांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित यंत्रणांना अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande