
घरगुती गॅस सिलिंडरमधून ऑटो रिक्षांमध्ये भरला जात होता गॅस;दोघांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर, 2 जून (हिं.स.) । शहरातील शिवाजी पेठेतील महाकाली मंदिर परिसरात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक ऑटो रिक्षांमध्ये बेकायदेशीर आणि धोकादायक पद्धतीने गॅस भरला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या धाडीत या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे 38,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
पुरवठा विभागाला महाकाली मंदिर परिसरात एका ऑटो रिक्षामध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला. तपासादरम्यान जवळच असलेल्या एका कौलारू घराची झाडाझडती घेतली असता तेथे अवैध गॅस रिफिलिंगचा व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान राजेंद्र चंद्रकांत मस्के (वय 48) आणि स्वप्निल शिंदे (वय 18) यांना ताब्यात घेण्यात आले. विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 287 तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 मधील कलम 3 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त
छाप्यामध्ये गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी विविध उपकरणे जप्त करण्यात आली. त्यामध्ये दोन 2 एचपी क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटारी, पाच एचपीसीएल गॅस सिलिंडर (दोन भरलेले व तीन रिकामे), इलेक्ट्रिक वजनकाटा, वजनमाप, नोजल, पाईप, केबल बोर्ड तसेच ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम स्कॅनर आणि क्यूआर-कोड बोर्ड यांचा समावेश आहे.
पुरवठा विभागाने जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत 38,800 रुपये असल्याचे सांगितले आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही अवैध गॅस रिफिलिंग, काळाबाजार किंवा जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कारवाईत पुरवठा निरीक्षक महेश काटकर, नम्रता कुडाळकर, तुषार पाटील, अभिजित खोत, लिपिक विपुल पाटील, जयवंत गोते, सुशीलकुमार खोंद्रे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी सहभाग घेतला.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar