
सोलापूर, 02 जून, (हिं.स.) विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांच्या संख्याबळावर सूचक टिप्पणी करत निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या उमेदवारासाठी सूचकांची नावे मिळविण्यासाठी आपल्याला फोन आल्याचा दावाही त्यांनी केला. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना गोरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला.
‘‘पक्षश्रेष्ठींनी माझ्या सहकाऱ्याला उमेदवारीची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. पक्षाची ताकद वाढल्याने अनेक सहकाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र जागा एकच असल्याने पक्षाने योग्य निर्णय घेतला आहे. आता सर्वांनी एकत्र येऊन राजेंद्र राऊत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे गोरे म्हणाले.
विरोधकांच्या उमेदवारीबाबत भाष्य करताना त्यांनी दावा केला की, काँग्रेसच्या उमेदवारासाठी सूचकांची नावे मिळविण्यासाठी त्यांना काही फोन आले होते. विरोधकांचे संख्याबळ मर्यादित असल्याने निवडणूक लढवून विशेष फायदा होत नसेल, तर त्यांनी बिनविरोध निवडणुकीचा विचार करावा आणि जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण करावा, असा सूचक सल्लाही त्यांनी दिला. ‘‘इतर कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात, हे पाहिल्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल. मात्र संवादासाठी आमचे दरवाजे खुले आहेत आणि विरोधकांशी चर्चा करण्यासही आम्ही तयार आहोत,’’ असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड