
सोलापूर, 02 जून (हिं.स.)राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होत असताना शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतावर अवलंबून न राहता उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यात मागील तीन वर्षांमध्ये खरीप हंगामात सुमारे ४४ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला असून त्यात युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते आणि एसएसपी यांचा मोठा वाटा आहे.
डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असते. मात्र, पुरवठ्याच्या मर्यादांमुळे त्याऐवजी एसएसपी, टीएसपी आणि विविध एनपीके संयुक्त खतांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एसएसपी खतामध्ये १६ टक्के स्फुरदाबरोबरच सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असल्याने ते विशेषतः तेलबिया पिकांसाठी फायदेशीर ठरते. डीएपीच्या एका गोणीच्या पर्याय म्हणून अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या एसएसपी वापरणे उपयुक्त ठरू शकते.तसेच एनपीके १०:२६:२६, २०:२०:०:१३, १२:३२:१६, १५:१५:१५ आणि युरिया-एसएसपी कॉम्प्लेक्स यांसारख्या संयुक्त खतांमधून नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे संतुलित पोषण मिळते. टीएसपी खतामध्ये ४६ टक्के स्फुरद असल्याने डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी टीएसपी वापरणे हा देखील प्रभावी पर्याय ठरू शकतो.चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उपलब्धतेनुसार एसएसपी, टीएसपी आणि विविध संयुक्त खतांचा वापर करून संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड