अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ : उमेदवारांच्या संपत्तीची चर्चा
कोट्यवधींच्या मालमत्तेची माहिती शपथपत्रातून उघड अमरावती, 2 जून (हिं.स.) : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत तीन दिग्गज उमेदवारांमध्ये होताना दिसत आहे. महायुतीकडून भाजपचे उमेदव
Local authority constituency elections: Crores of rupees in affidavits of Pote Patil, Deshmukh, independent Bajoria also in discussion


Local authority constituency elections: Crores of rupees in affidavits of Pote Patil, Deshmukh, independent Bajoria also in discussion


Local authority constituency elections: Crores of rupees in affidavits of Pote Patil, Deshmukh, independent Bajoria also in discussion


कोट्यवधींच्या मालमत्तेची माहिती शपथपत्रातून उघड

अमरावती, 2 जून (हिं.स.) : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत तीन दिग्गज उमेदवारांमध्ये होताना दिसत आहे. महायुतीकडून भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या शपथपत्रांमुळे त्यांच्या मालमत्ता व आर्थिक स्थितीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विप्लव बाजोरिया यांच्याकडे 24 कोटींची मालमत्ता

अकोला येथील रहिवासी आणि एलएलबी शिक्षण घेतलेले अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 24.34 लाख रुपये रोख असून जंगम मालमत्ता 15.16 कोटी रुपयांची आहे. पत्नी राशी बाजोरिया यांच्या नावे 1.14 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. बाजोरिया यांच्याकडे सुमारे 7 कोटी रुपयांची स्वसंपादित मालमत्ता असून तिचे सध्याचे बाजारमूल्य 24 कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्यावर 23.81 लाख रुपयांचे कर्ज आहे.

प्रवीण पोटे यांच्याकडे 270 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता

अमरावतीच्या राठीनगर येथील रहिवासी आणि बी.कॉम. शिक्षण घेतलेले भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांनी 2025-26 या आर्थिक वर्षात 85.25 लाख रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे शपथपत्रात नमूद आहे.

पोटे यांच्याकडे 4.20 लाख रुपये रोख रक्कम असून विविध बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. त्यांनी वैयक्तिक स्वरूपात कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याची नोंदही शपथपत्रात आहे. त्यांच्या नावे 250 ग्रॅम तर पत्नी अनुराधा पोटे यांच्या नावे 755 ग्रॅम सोने आहे. तसेच दोघांकडे मिळून 45 किलो चांदीच्या वस्तू आहेत.

पोटे यांच्या नावे असलेल्या स्वसंपादित मालमत्तेचे सध्याचे बाजारमूल्य 137.96 कोटी रुपये, तर पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेचे मूल्य 132.91 कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्यावर 2.72 कोटी रुपये, तर पत्नीवर 2.08 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

हर्षजित देशमुख यांच्याकडे कोट्यवधींची जंगम मालमत्ता

नागपूरच्या त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी आणि एमबीए शिक्षण घेतलेले काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख हे व्हर्चुअल गॅलेक्सी इन्फोटेक कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी एकता देशमुख खासगी व्यवसाय करतात.

देशमुख यांनी 2025-26 या वर्षासाठी 25.39 लाख रुपयांचे उत्पन्न दाखवले असून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 3 लाख रुपये रोख रक्कम, विविध बँकांमध्ये सुमारे 78 लाख रुपयांच्या ठेवी आणि विमा व म्युच्युअल फंडांमध्ये 1.18 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

त्यांच्याकडे 42.45 लाख रुपये किमतीचे वाहन असून 300 ग्रॅम सोने, तर पत्नीच्या नावे 600 ग्रॅम सोने आहे. पत्नीच्या नावे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात 1.62 हेक्टर शेती आहे. देशमुख यांच्या नावे नागपुरात तीन फ्लॅट तर पत्नीच्या नावे दोन फ्लॅट आहेत.

त्यांची जंगम मालमत्ता 2.83 कोटी रुपये, तर स्वसंपादित मालमत्ता 2.25 कोटी रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्यावर 84.97 लाख रुपयांचे कर्ज आहे.

संपत्तीच्या आकडेवारीने निवडणुकीत रंगत

अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रांमधून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांसोबतच उमेदवारांच्या आर्थिक सामर्थ्याचीही चर्चा रंगली आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande