अमरावती पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल; 164 जणांच्या बदल्या
अमरावती, 2 जून (हिं.स.) : अमरावती शहर पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या 164 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामान्य बदल्या करण्यात
अमरावती पोलीस दलात मोठी प्रशासकीय सर्जरी; 164 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मार्ग मोकळा


अमरावती, 2 जून (हिं.स.) : अमरावती शहर पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या 164 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामान्य बदल्या करण्यात येणार आहेत.

या प्रक्रियेला पूर्ण पारदर्शकता मिळावी यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी सर्व बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा विशेष दरबार घेत त्यांच्या अडचणी आणि मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.

पोलीस मुख्यालयाच्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) ते पोलीस शिपाई या दर्जापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. नियमानुसार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असून, त्यांच्या विनंती अर्जांवरही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विशेष दरबारानंतर अंतिम बदली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

या प्रशासकीय फेरबदलाचा दुसरा टप्पा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. या टप्प्यात पोलीस निरीक्षक (PI) दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून, शहरातील तीन प्रमुख पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांनाही बदल्यांचा फटका बसण्याची शक्यता आहे. निर्धारित कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

कार्यक्षमता वाढवण्यावर भर

पोलीस विभागाकडून ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले असले तरी, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि प्रतिसादक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या व्यापक फेरबदलामुळे अमरावती पोलीस दलात हालचाली वाढल्या असून, आगामी दिवसांत वरिष्ठ स्तरावर आणखी बदल्यांची शक्यता वर्तवली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande