परभणी जिल्ह्यात एसआयआर मोहिमेला गती; 73 टक्के काम पूर्ण
परभणी, 2 जून (हिं.स.) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज मॅपिंग आणि विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कामाचा आढावा घेण्यात आला. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 73 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. बैठकीत उपविभाग
परभणी जिल्ह्यात एसआयआर मोहिमेला गती; 73 टक्के काम पूर्ण


परभणी, 2 जून (हिं.स.) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज मॅपिंग आणि विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कामाचा आढावा घेण्यात आला. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 73 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बैठकीत उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आणि तहसीलदार संदीप राजापुरे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाची गती वाढविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. विशेषतः परभणी शहरातील SIR काम 95 टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचे तातडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

काही बीएलओंची प्रगती मंद

बैठकीत समोर आलेल्या आकडेवारीनुसार काही बीएलओंनी 92 ते 99 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण केले आहे, तर काहींची प्रगती केवळ 30 ते 40 टक्के असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उर्वरित काम 3 ते 5 जून 2026 दरम्यान पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सर्व बीएलओ आणि सुपरवायझर यांना काम पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

उत्कृष्ट काम करणाऱ्या बीएलओंचा सन्मान

या बैठकीत 80 ते 99 टक्के काम पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विशेष कामगिरी करणाऱ्यांमध्ये बद्रीनाथ विष्णू घुले (98.80%), मो. रिझवान उल्ला (94.88%) आणि नंदकिशोर डाके (94.48%) यांचा समावेश आहे.

घरोघरी पडताळणीवर भर

उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्स (BLA) यांना सोबत घेऊन घरोघरी पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. हे काम पुढील तीन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यानंतर सहाय्यक कर्मचारी उपलब्ध करून देऊन 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेटी देऊन फॉर्म भरून ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 जुलै ते 29 ऑगस्ट दरम्यान अर्जांची छाननी केली जाणार आहे.

पारदर्शक व अचूक प्रक्रियेवर भर

बैठकीत 2002 च्या मतदार यादीच्या आधारे मॅपिंग, फोटो अपलोड आणि माहिती पडताळणी यावर भर देण्यात आला. मतदारांची अचूक नोंदणी करण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

आयुक्त नितीन नार्वेकर यांनी काही बीएलओंची प्रगती अत्यंत कमी असल्याबाबत नाराजी व्यक्त करत, सर्वांनी किमान 90 टक्के काम पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

प्रशासनाने नागरिकांना भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपली माहिती तपासण्याचे तसेच बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. घराघरांत जाऊन माहिती पडताळणी आणि अद्ययावत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande