
पुणे, 02 जून (हिं.स.) पुण्यातील बहुप्रतिक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाची प्रगती झाली असून या मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीचा प्रमुख टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. त्यामुळे आयटी हब असलेल्या हिंजवडीला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही मेट्रो सेवा लवकरच प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खासगी भागीदारीत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पुण्यातील तिसरी मेट्रो मार्गिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने चार दिवस सखोल तपासणी केली. आता अंतिम अहवाल आणि मंजुरीनंतर या मार्गावरील सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात माण ते रामनगर (बाणेर) दरम्यानच्या १२ स्थानकांपर्यंत सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हाय स्ट्रीट (बाणेर) ते शिवाजीनगर या ११ स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे.दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हिंजवडी आणि पुणे शहरादरम्यानची संपूर्ण मेट्रो सेवा कार्यान्वित होईल. त्यामुळे विशेषतः राजीव गांधी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसह लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही या प्रकल्पाची मोठी मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु