
परभणी, 2 जून (हिं.स.) : कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि कापूस उत्पादनात क्रांतिकारी कार्य केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ शेतकरी श्रीरंग लाड यांचा खासदार संजय जाधव यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
राष्ट्रपतींच्या हस्ते नुकताच पद्मश्री पुरस्कार स्वीकारलेल्या श्रीरंग लाड यांच्या कार्यामुळे परभणी जिल्ह्याचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील शेतकरी समुदाय, कृषी क्षेत्र आणि परभणीच्या मातीतून घडलेल्या कर्तृत्ववान परंपरेचा गौरव झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
खासदार संजय जाधव यांनी श्रीरंग लाड यांचे कार्य हे केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण शेतकरी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी खासदार संजय जाधव यांच्या पत्नी सौ. क्रांती जाधव तसेच नगरसेवक डॉ. केदार खटींग उपस्थित होते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis