
पुणे, 02 जून (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असलेले व्यक्तीनिर्माण सातत्यपूर्ण समाजपरिवर्तनातूनच शक्य आहे. सेवाकार्यात संघाला कोणालाही 'ओव्हरटेक' करायचे नाही किंवा कोणाचे काम 'टेकओव्हर' करायचे नाही, तर समाजातील सज्जनशक्तीला सोबत घेऊनच राष्ट्रकार्य करायचे आहे असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र प्रांत सद्भावना गतिविधी सह-संयोजक प्रमोद कुलकर्णी यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, छत्रपती संभाजी भागाच्या वतीने आयोजित 'संघशताब्दी समाजशिल्पी संमेलन' नुकतेच येथील कमिन्स कॉलेजमध्ये झाले.त्यावेळी कुलकर्णी बोलत होते. या संमेलनाला संभाजी भागातील सेवा, गोसेवा, पर्यावरण आणि विविध सामाजिक संस्थांचे संचालक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमोद कुलकर्णी यांनी संघाचा १०० वर्षांचा गौरवशाली प्रवास आणि संघर्षाचा इतिहास मांडला. ते म्हणाले संघात व्यक्तीमहात्म्यापेक्षा विचार आणि संघटनेला महत्त्व आहे. म्हणूनच कदाचित डॉ. हेडगेवार यांचे नाव अनेकांना माहीत नसेल, पण त्यांनी लावलेला संघवृक्ष आज देशभर अविरत कार्यरत आहे. संघाचा १०० वर्षांचा प्रवास मांडताना त्यांनी अनेक घटनांचा उल्लेख केला. महात्मा गांधींची भेट (१९३७)- वर्धा येथील संघ शिक्षा वर्गाला भेट दिली असता, स्वयंसेवकांमध्ये असलेली जातिभेदविरहित समरसता पाहून गांधीजींनी संघाची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.* फाळणीतील बलिदान (१९४७)- देशाच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानात अडकलेल्या हिंदू बांधवांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी स्वयंसेवकांनी प्राणांची बाजी लावली.
* गोवंश रक्षणासाठी जनआंदोलन- देशात गोहत्याबंदी कायदा व्हावा यासाठी दळणवळणाची कोणतीही आधुनिक साधने नसताना स्वयंसेवकांनी देशभर फिरून तब्बल ८ कोटी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर केले होते.
* भारत-चीन युद्ध (१९६२)- युद्धकाळात जनतेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी स्वयंसेवकांनी केलेल्या कामगिरीवर प्रभावित होऊन तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ च्या प्रजासत्ताक दिन संचलनात ३ हजार संघ स्वयंसेवकांना पूर्ण गणवेशात सहभागी करून घेतले होते.
* आंध्रातील चक्रीवादळ (१९७७) -तेथील मदतकार्यातील संघाची तत्परता पाहून स्थानिक सर्वोदयी नेते प्रभाकर राव यांनी RSS चा उल्लेख 'Ready for Self Service' असा केला होता.
* सेवाकार्यांचा विस्तार- १९८९ मध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी वर्षभरात ५ हजार सेवाकार्ये सुरू करण्याचा संकल्प केला होता. आज हा आकडा १ लाख ५० हजार पेक्षा अधिक सेवाकार्यांपर्यंत पोहोचला आहे.अशा अनेक दाखल्यातून त्यांनी संघाचा शंभर वर्षांचा आढावा मांडला.
संभाजी भाग संपर्क प्रमुख सचिन अग्निहोत्री यांनी 'पंचपरिवर्तन' या विषयावर मार्गदर्शन केले. कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण, नागरी कर्तव्य आणि 'स्व'चा बोध या पाच घटकांवर त्यांनी प्रकाश टाकला. शासन, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी काय करतील याची वाट न बघता, 'माझ्या पातळीवर मी काय करू शकतो' हा विचार करून प्रत्येकाने प्रत्यक्ष कृती केली, तरच खरे परिवर्तन घडेल, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक 'वंदे मातरम्'ने झाली. भाग सेवा प्रमुख विक्रम फडके यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला आणि प्रास्ताविकातून संघ स्थापनेचा मूळ उद्देश स्पष्ट केला. १९२५ मध्ये देशात स्वातंत्र्याचा ध्यास होताच; पण भविष्यात पुन्हा कधीही पारतंत्र्याची वेळ येणार नाही, असा सक्षम व जाज्वल्य समाज निर्माण करण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली, असे त्यांनी सांगितले.कल्याण मंत्राने संमेलनाचा समारोप झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु