
आर्थिक विकास, पर्यावरण संवर्धन आणि व्यवसाय वृद्धीसाठी प्रदर्शनांचे महत्त्व अधोरेखित
नाशिक, 2 जून (हिं.स.) । प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन 2026’च्या निमित्ताने प्रदर्शन क्षेत्राच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासातील महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला आहे. यावर्षी 3 जून रोजी हा दिवस जगभरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
गेल्या 11 वर्षांपासून जून महिन्यातील पहिला बुधवार ‘जागतिक प्रदर्शन दिन’ (Global Exhibitions Day - GED) म्हणून साजरा केला जातो. प्रदर्शन क्षेत्रातील सुधारणा, नवकल्पना आणि उद्योगाशी संबंधित विविध घटकांमध्ये संवाद व सहकार्य वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यंदाच्या ‘GED 2026’ची संकल्पना “People, Planet and Performance” या तीन महत्त्वपूर्ण आधारस्तंभांवर आधारित आहे. प्रदर्शनांच्या माध्यमातून मानव विकास, पर्यावरणपूरक उपक्रम आणि व्यवसायिक प्रगतीला चालना देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती देताना नाशिकस्थित प्रदर्शन आयोजक आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि.चे संचालक साहिल न्याहारकर यांनी सांगितले की, प्रदर्शनांच्या माध्यमातून विविध उद्योग, उद्योजक, प्रदर्शनार्थी आणि व्यावसायिक एकत्र येतात. त्यामुळे संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते.
ते पुढे म्हणाले की, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज बनली असून प्रदर्शनांच्या माध्यमातून शाश्वत विकास, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक औद्योगिक पद्धतींना प्रोत्साहन देता येते. उद्योगांनी आपला पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना स्वीकाराव्यात, यासाठीही प्रदर्शने प्रभावी व्यासपीठ ठरत आहेत.
प्रदर्शने केवळ उत्पादनांचे सादरीकरण करण्यापुरती मर्यादित नसून ती उद्योगवृद्धी, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देतात. यामुळे लघु, मध्यम तसेच मोठ्या उद्योगांना व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक संधी मिळतात.
प्रदर्शन उद्योग हा रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आकर्षित करणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही या निमित्ताने अधोरेखित करण्यात आले.-----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV