रायगड - अमृत पर्यटन उपक्रमातून स्वयंरोजगाराला चालना
रायगड, 02 जून (हिं.स.)। : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अमृत पर्यटन उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम उद्योजकता विकास का
paryatan


रायगड, 02 जून (हिं.स.)। : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अमृत पर्यटन उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम उद्योजकता विकास कार्यक्रम - ईडीपी आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना आधुनिक व्यवसाय कौशल्ये प्राप्त करून देणे आणि पर्यटन व्यवसायाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

अमृत पर्यटन हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा विकास, स्थानिक रोजगार निर्मिती आणि पर्यटनाशी संबंधित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने आणि पर्यटन व्यवसायांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमाचा भर आहे.

पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक मानले जाते. या क्षेत्रात व्यवसाय विस्तार, रोजगार निर्मिती आणि आर्थिक प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याने उद्योजकांना सक्षम करण्यासाठी या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात टूर अँड ट्रॅव्हल्स व्यवसायिक, पर्यटन मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड), कुक अँड केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात.

प्रशिक्षणादरम्यान व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नव्या व्यवसाय संधी तसेच शासनाच्या विविध योजना व सहाय्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय अनुभवी तज्ज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगार आणि उद्योजकता वाढीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, पर्यटनाशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि इच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी अमृत रायगड जिल्हा कार्यालय, कलेक्टर कार्यालय परिसर, भूसंपादन उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, हिराकोट तलावासमोर, अलिबाग येथे संपर्क साधावा. तसेच 9112228759, 8149552143 किंवा 8879278740 या क्रमांकांवरही माहिती उपलब्ध होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande