
पुणे, 02 जून (हिं.स.)। शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका निवृत्त अभियंत्याची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ६६ वर्षीय निवृत्त अभियंता कोथरूड परिसरातील गणेशनगर भागात राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात त्यांनी समाजमाध्यमावर शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील एक आकर्षक जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीत कमी कालावधीत मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जादा नफ्याच्या आमिषाला बळी पडत त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवून विशेष गुंतवणूक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. या ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारातील व्यवहार आणि गुंतवणुकीवरील परताव्याची माहिती दाखविण्यात येत होती. चोरट्यांनी विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला आकर्षक परताव्याचे आकडे दाखवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर मोठा नफा मिळत असल्याचा भास निर्माण करून त्यांनी फिर्यादींकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा संशय आहे. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर निवृत्त अभियंत्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक व्यवहार, मोबाईल क्रमांक आणि संबंधित ॲपची माहिती तपासली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आकर्षक जाहिरातींना बळी न पडण्याचे आणि कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी व प्लॅटफॉर्मची खातरजमा करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु