पुणे नालेसफाईची 31 मेची मुदत हुकली; महापालिकेने डेडलाइन 15 जूनपर्यंत वाढवली
पुणे, 02 जून (हिं.स.)। पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, पावसाळी गटारे, स्टॉर्म वॉटरलाइन्स आणि कल्व्हर्ट्सची सफाई 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या महापालिकेला ही मुदत पाळण्यात अपयश आले आहे. त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आता 15 जू
PMC news


पुणे, 02 जून (हिं.स.)। पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, पावसाळी गटारे, स्टॉर्म वॉटरलाइन्स आणि कल्व्हर्ट्सची सफाई 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या महापालिकेला ही मुदत पाळण्यात अपयश आले आहे. त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आता 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, त्या कालावधीत सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरातील नालेसफाईचे 85 टक्के, पावसाळी गटारसफाईचे 59 टक्के आणि चेंबर सफाईचे 63 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये कामे अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा जवळ आल्याने उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण 129 नाले असून त्यांची लांबी 2 लाख 34 हजार 512 मीटर इतकी आहे. यापैकी 2 लाख 21 हजार 500 मीटर नाल्यांची सफाई करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ 55 हजार 391 मीटर नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून, तब्बल 1 लाख 67 हजार 59 मीटर नाल्यांची सफाई अद्याप बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या दररोज सरासरी 3 हजार 512 मीटर नाले साफ करण्यात येत आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने कामाचा वेग वाढविण्यात येत असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास मुसळधार पावसात पाणी साचणे, जलनिकासी व्यवस्था विस्कळीत होणे आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे उर्वरित कामे नियोजित मुदतीत पूर्ण होतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande