
पुणे, 02 जून (हिं.स.)।पुणे विभागात वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली असून सुमारे सव्वा तीन लाख नागरिकांना सध्या २०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. विभागीय प्रशासनाच्या माहितीनुसार, या टँकरद्वारे २०८ गावे आणि ७७६ वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागात सर्वाधिक पाणीटंचाई पुणे जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यात १०४ टँकर कार्यरत असून त्यांच्यामार्फत ९९ गावे आणि ४२६ वाड्या-वस्त्यांतील १ लाख ७३ हजार ५२९ नागरिक तसेच २० हजार ३०३ पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे.मार्च महिन्यापासून विभागातील तापमान सातत्याने ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून भूजल पातळी झपाट्याने खालावत आहे. तसेच पाण्याचा वाढता वापर आणि अपुरा साठा यामुळे अनेक धरणांवरील ताण वाढला असून काही जलसाठे कोरडे पडण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांमध्ये पेयजल योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना म्हणून शाश्वत पाणीपुरवठा योजना आणि जलसंधारण कामांना गती देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु