
सोलापूर, 02 जून (हिं.स.)विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार रमेश बारस्कर यांनी हरकत नोंदविली आहे. या हरकतींवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्तिकेयन निर्णय देणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
रमेश बारस्कर यांच्या वतीने ऍड. विक्रम कसबे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आक्षेप सादर केला. हरकतीनुसार, राजेंद्र राऊत यांनी नामनिर्देशन पत्रात वयाबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्जातील संबंधित नोंदींमध्ये पूर्ण केलेल्या वयाचा स्पष्ट उल्लेख नसून दोन्ही ठिकाणी एकच वय नमूद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच २०१९ ते २०२४ या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत असताना शासकीय निवासस्थान उपलब्ध झाले होते. मात्र नामनिर्देशन पत्रात तसे निवासस्थान मिळाले नसल्याचे नमूद करण्यात आल्याचा आरोपही हरकतीत करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उपलब्ध कागदपत्रे व नियमांचा अभ्यास करून अंतिम निर्णय देणार आहेत.दरम्यान, छाननी प्रक्रियेदरम्यान विविध उमेदवारांच्या अर्जांवर हरकती नोंदविल्या गेल्याने सोलापूर विधान परिषद निवडणुकीत चुरस वाढली आहे. आता राजेंद्र राऊत यांच्या अर्जावरील हरकतींबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड