सोलापूर : मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात पुरुषांच्या कक्षात महिलांवर उपचार
सोलापूर, 02 जून (हिं.स.)।मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात पुरुषांच्या जनरल वार्डमध्ये महिला रुग्णांना दाखल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी रुग्ण आणि त्यांच्या ना
sdfg


सोलापूर, 02 जून (हिं.स.)।मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात पुरुषांच्या जनरल वार्डमध्ये महिला रुग्णांना दाखल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजी कारभाराबाबत तक्रारींचा पाढाच खासदारांसमोर वाचला.

नुकत्याच झालेल्या जालिहाळ आणि हाजापूर गावभेट दौऱ्यादरम्यान हाजापूर येथील नागरिक कुंडलिक बिचुकले यांनी आपल्या नातेवाईकाला ग्रामीण रुग्णालयात आलेल्या अडचणींबाबत खा. शिंदे यांना माहिती दिली होती. त्यावेळी रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात भेट देत विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, राज्य सचिव अॅड. रविकिरण कोळेकर, शहराध्यक्ष अॅड. राहुल घुले, नाथा ऐवळे, अशोक चेळेकर, बापू अवघडे, सुनिता अवघडे, प्रसिद्धीप्रमुख संदीप पवार, कुंडलिक बिचुकले तसेच नागरिक, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. पाहणीदरम्यान जनरल वार्डमध्ये महिला रुग्णांनाही उपचारासाठी दाखल केल्याचे निदर्शनास आल्यानंतर खा. शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या प्रकाराबाबत आक्षेप नोंदविला. महिला रुग्णांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देतानाच रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande