लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
लातूर, 02 जून (हिं.स.)।राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि न
ग्रामपंचायत निवडणूक


लातूर, 02 जून (हिं.स.)।राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या प्रक्रियेत लातूर, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा आणि औसा तालुक्यातील एकूण ४१४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ८ जून २०२६ रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येणार असून १२ जून २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेऊन सदस्य आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

त्यानंतर १७ जून २०२६ रोजी प्रभागनिहाय आरक्षणाच्या प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळणार असून १९ जून २०२६ रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच १९ ते २५ जून या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध राहणार आहे.

प्राप्त हरकतींवर सुनावणी करून ३ जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी अभिप्राय सादर करतील. त्यानंतर ८ जुलै रोजी अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता दिली जाईल. अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षणाला १० जुलै २०२६ रोजी व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाला वेग आला असून इच्छुक उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सायली ठाकूर यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande