सीना नदीत पाणी सोडा; शेतकऱ्यांचा माढ्यात जनआक्रोश मोर्चा
सोलापूर, 02 जून, (हिं.स.)। सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांवर महापुरानंतर आता पाणीटंचाईचे संकट ओढावल्याने धाराशिव जिल्ह्यातील कोळेगाव धरणातून तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढा येथे भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नदीकाठच्या गावा
सीना नदीत पाणी सोडा; शेतकऱ्यांचा माढ्यात जनआक्रोश मोर्चा


सोलापूर, 02 जून, (हिं.स.)। सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांवर महापुरानंतर आता पाणीटंचाईचे संकट ओढावल्याने धाराशिव जिल्ह्यातील कोळेगाव धरणातून तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढा येथे भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नदीकाठच्या गावांतील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान शेतकरी नेते मुन्ना साठे यांनी तीव्र भावना व्यक्त करत सांगितले की, महापुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतजमिनी वाहून गेल्या, तर अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्या जखमा अजूनही ताज्या असताना आता नदीपात्र कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे कोळेगाव धरणातून तात्काळ पाणी सोडावे, अन्यथा भविष्यात या धरणातून सीना नदीत पाणी सोडण्यालाच विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी संजय पाटील घाटणेकर यांनी उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चुकीच्या नियोजनामुळे आधी महापुराचा फटका बसला आणि आता पाण्याअभावी रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोळेगाव धरणातून पाणी सोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.आंदोलकांनी पुढील काळात गावोगावी समित्या स्थापन करून संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande