सोलापूर - स्मार्ट महापालिकेचा कारभार पुन्हा भोंग्यावर; कर्मचारी वेळेचे पालन करण्यावर भर
सोलापूर, 02 जून, (हिं.स.)। सोलापूर महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजात शिस्त आणि वेळेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महापालिका आवारात पुन्हा भोंगा व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या आदेशानुसार सोमवारपासून कार्यालयीन वेळेत दि
smc


सोलापूर, 02 जून, (हिं.स.)। सोलापूर महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजात शिस्त आणि वेळेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महापालिका आवारात पुन्हा भोंगा व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या आदेशानुसार सोमवारपासून कार्यालयीन वेळेत दिवसातून चार वेळा भोंगा वाजविण्यास सुरुवात करण्यात आली. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांना कार्यालयीन वेळांची जाणीव व्हावी आणि वेळेचे महत्त्व समजावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार कौन्सिल हॉल सभागृहाखालील कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालयात भोंग्याची यंत्रणा बसविण्यात आली. एक जूनपासून ही व्यवस्था पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, नियोजित वेळेनुसार भोंगा वाजविण्याची जबाबदारी कामगार कल्याण व जनसंपर्क विभागाकडे सोपविण्यात आली आहे.महापालिका आवारात घुमणाऱ्या या भोंग्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळांचे स्मरण होत असून, कामकाजात वेळेचे पालन करण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाच्या या उपक्रमामुळे कार्यालयीन शिस्त अधिक प्रभावीपणे राखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande