रेल्वे परिसरात धूम्रपानावर कठोर कारवाईचा इशारा; जनजागृती मोहीम तीव्र
रेल्वे सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास 5 वर्षांपर्यंत कारावासाची शक्यता परभणी, 2 जून (हिं.स.) : रेल्वे गाड्या तसेच रेल्वे परिसरात धूम्रपान करणे केवळ नियमभंग नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य असल्याने अशा प्रकारांवर कठो
रेल्वे परिसरात धूम्रपानावर कठोर कारवाईचा इशारा; जनजागृती मोहीम तीव्र


रेल्वे सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास 5 वर्षांपर्यंत कारावासाची शक्यता

परभणी, 2 जून (हिं.स.) : रेल्वे गाड्या तसेच रेल्वे परिसरात धूम्रपान करणे केवळ नियमभंग नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रेल्वे परिसरात जळती सिगारेट, बीडी, आगपेटीच्या काड्या किंवा इतर ज्वलनशील वस्तू निष्काळजीपणे फेकल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि मालमत्तेला मोठा धोका निर्माण होतो.

रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 167 नुसार रेल्वे डबे किंवा परिसरात धूम्रपान करणे दंडनीय गुन्हा आहे. तर कलम 153 नुसार निष्काळजीपणा किंवा बेकायदेशीर कृत्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास दोषींना पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

कारवाई आणि दंडात्मक उपाय

नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि तिकीट तपासणी कर्मचारी नियमित तपासण्या, अचानक धाडी आणि जनजागृती मोहिमा राबवत आहेत. या मोहिमांतून मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

एप्रिल 2026 मध्ये धूम्रपानाच्या 52 प्रकरणांमध्ये कारवाई करून सुमारे 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मे 2026 मध्ये 299 प्रकरणांवर कारवाई करून 58 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे दोन महिन्यांत एकूण 351 प्रकरणे नोंदवून 68 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

याशिवाय कलम 153 अंतर्गत एप्रिल आणि मे महिन्यांत प्रत्येकी चार अशा एकूण आठ गंभीर प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन

दक्षिण मध्य रेल्वेने सर्व प्रवासी आणि नागरिकांना रेल्वे गाड्या व परिसरात धूम्रपान टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच जळत्या वस्तू निष्काळजीपणे न फेकणे आणि अशा घटना आढळल्यास तात्काळ रेल्वे कर्मचारी, आरपीएफ किंवा हेल्पलाईन क्रमांक 139 वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, “एक क्षणाची निष्काळजीपणा शेकडो जीव धोक्यात घालू शकतो,” त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande