
सोलापूर, 02 जून (हिं.स.)। क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड इन इंडिया (CABI) यांच्या वतीने इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या अंध महिला क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. शिबिरात महाराष्ट्रातील विविध भागांतील २५ अंध महिला क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदविला. समारोप कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी सहभागी खेळाडूंच्या जिद्द, आत्मविश्वास आणि क्रीडाप्रेमाचे विशेष कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा संभाजी कदम यांचा विशेष सत्कार. कुशल जैन यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. गंगा कदम यांच्या यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासामुळे उपस्थित प्रशिक्षणार्थी खेळाडूंना नवचैतन्य आणि प्रेरणा मिळाली.यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेबर्सू, CABIच्या राजश्री रमावत, राजू शेळके, प्रशिक्षकवर्ग तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. शिबिरादरम्यान खेळाडूंना क्रिकेटमधील तांत्रिक कौशल्यांसह शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि स्पर्धात्मक मानसिकतेचे प्रशिक्षण देण्यात आले.शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी खेळाडू, प्रशिक्षक आणि आयोजकांनी समाधान व्यक्त केले. अंध महिला क्रिकेटपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड