
ओस्लो, २ जून (हिं.स.)नॉर्वे बुद्धिबळ २०२६ ची सातवी फेरी अत्यंत रोमांचक ठरली. एका सामन्याचा निकाल क्लासिकल बुद्धिबळात, तर इतर दोन सामन्यांचा निकाल आर्मागेडॉन टायब्रेकरद्वारे लागला.
सातव्या फेरीत भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने दिवसातील सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवला. त्याने क्लासिकल बुद्धिबळाच्या सामन्यात अलीरेझा फिरौजाला हरवून विजेतेपदाची शर्यत अधिकच रोमांचक बनवली आहे. चुरशीच्या सामन्यात, प्रज्ञानानंदने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले आणि आपल्या आघाडीचे विजयात रूपांतर केले. स्पर्धेतील अलीरेझा फिरौजाचा हा दुसरा क्लासिकल पराभव होता.
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसन आणि व्हिन्सेंट केमर यांच्यातील क्लासिकल सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर झालेल्या आर्मागेडॉन सामन्यात कार्लसेनने विजय मिळवून अतिरिक्त गुण मिळवले आणि अव्वल बुद्धिबळपटूंवरील दबाव कायम ठेवला.दरम्यान, विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश आणि वेस्ली सो यांच्यातील क्लासिकल सामना अनिर्णित राहिला. गुकेशने आर्मागेडन सामना जिंकून महत्त्वपूर्ण गुण मिळवले.
सातव्या फेरीनंतर, वेस्ली सो १२.५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. अलीरेझा फिरौजा १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर मॅग्नस कार्लसन, व्हिन्सेंट केमर आणि आर. प्रज्ञानानंद प्रत्येकी ९ गुणांसह विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहेत.
महिला गटात बिबिसारा असोबायेवाने आपली आघाडी अधिक मजबूत केली, दिव्या देशमुख दुसऱ्या स्थानावर आहे. बिबिसारा असोबायेवाने नॉर्वे बुद्धिबळ महिला चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपली आघाडी अधिक मजबूत केली. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना, तिने क्लासिकल सामन्यात झू जिनरला पराभूत करून पूर्ण तीन गुण मिळवले. मध्य-खेळात आघाडी घेतल्यानंतर, तिने आत्मविश्वासाने विजय मिळवला.
भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यातील क्लासिकल सामना अनिर्णित राहिला. पण दिव्याने काळ्या मोहऱ्यांनीनी खेळून आर्मागेडन सामना जिंकला आणि अतिरिक्त गुण मिळवले.दुसऱ्या सामन्यात, विद्यमान महिला विश्वविजेती जू वेनजुन आणि ॲना मुझीचुक यांच्यातील क्लासिकल सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर मुझीचुकने आर्मागेडन सामना जिंकून आपल्या खात्यात महत्त्वपूर्ण अतिरिक्त गुण जमा केले.
सातव्या फेरीनंतर, बिबिसारा असाउबायेवा १२.५ गुणांसह आघाडीवर आहे, तर दिव्या देशमुख १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ॲना मुझीचुक ९.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे