
ठाणे, 02 जून, (हिं.स.)। भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार, ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे शहरातील नागरिकांच्या संयुक्त सहभागाने रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी 'संडे ऑन सायकल' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस दल आणि नागरिक यांच्यामध्ये शारीरिक सुदृढता (फिटनेस) वाढवून, आरोग्याला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या सायकलिंग मोहिमेमध्ये ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मानव संसाधन विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मोहन पाटील यांनी केले आहे.
हा विशेष उपक्रम ७ जून रोजी सकाळी ठीक ६:०० वाजता ठाणे येथील साकेत मैदान येथून सुरू होणार आहे. साकेत मैदानावरून १० किलोमीटर अंतराची सायकल रॅली काढण्यात येणार असून, ती निर्धारित मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा साकेत मैदान येथेच येऊन पूर्ण होईल.
या आरोग्यदायी उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी ठाणे शहरातील महाविद्यालयांतून जास्तीत जास्त संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सायकलसह या रॅलीत सहभागी व्हावे. तसेच, संबंधित शैक्षणिक संस्थांनी आपल्या स्तरावरून या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून प्रसार करावा, अशी विनंती पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर