यूरिया-डीएपी खताचा साठाच नाही नेरपिंगळाई परिसरातील शेतकरी संकटात
अमरावती, 02 जून (हिं.स.)। खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नेरपिंगळाई परिसरातील शेतकरी यूरिया व डीएपी खतांच्या तीव्र टंचाईचा सामना करीत आहेत. मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी शेतमशागतीची कामे, बांधबंदिस्ती, नांगरणी, वखर
यूरिया-डीएपी खताचा साठाच नाही नेरपिंगळाई परिसरातील शेतकरी संकटात


अमरावती, 02 जून (हिं.स.)। खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नेरपिंगळाई परिसरातील शेतकरी यूरिया व डीएपी खतांच्या तीव्र टंचाईचा सामना करीत आहेत. मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी शेतमशागतीची कामे, बांधबंदिस्ती, नांगरणी, वखरणी तसेच बियाण्यांची खरेदी पूर्ण केली आहे. मात्र पिकांसाठी यूरिया आणि डीएपी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

नेरपिंगळाई व परिसरातील कृषी सेवा केंद्रांवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. अनेक शेतकरी खतांच्या शोधात एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी यूरिया व डीएपीचा साठा संपल्याचे चित्र असून काही ठिकाणी खत उपलब्ध होण्याबाबत निश्चित माहितीही दिली जात नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांच्यासह इतर खरीप पिकांसाठी डीएपी व यूरिया खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पेरणीपूर्वी आणि पिकांच्या प्रारंभिक वाढीच्या टप्प्यात या खतांची गरज भासत असल्याने शेतकरी आधीच साठा करून ठेवण्याचा प्रयत्न करतात. यावर्षी मात्र हंगामाच्या सुरवातीलाच खतांची कमतरता जाणवत असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. शेतकऱ्यांच्या मते, केंद्र आणि राज्य सरकारकडून दरवर्षी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात खरीप हंगाम सुरू होताच खतांची टंचाई निर्माण होत असल्याने नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध झाली नाहीत तर पेरणी उशिरा होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम उत्पादनावर आणि आर्थिक उत्पन्नावर होऊ शकतो. सध्या शेतीसाठी लागणारे बियाणे, कीटकनाशके, मजुरी आणि मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकरी कर्ज काढून किंवा आर्थिक तजवीज करून हंगामाची तयारी करतात. मात्र आवश्यक खतेच उपलब्ध नसल्याने त्यांचे संपूर्ण नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande