
अमरावती, 2 जून (हिं.स.) : चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरखेडा येथे विषारी दारू प्राशन केल्याने तिघेजण गंभीर आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिघांनाही प्राथमिक उपचारानंतर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पोलिसांना संशयास्पद अवस्थेत तीन व्यक्ती आढळून आल्या. यामध्ये दिनेश गुणवंत लाड (46), सागर ज्ञानेश्वर टेंभे (38) आणि मनीष देवराव शेंडे (44) यांचा समावेश आहे. तिघांनाही सतत उलट्या होत असल्याने त्यांना तातडीने चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील विशेष उपचारासाठी अन्य रुग्णालयात रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.
दारू प्राशनानंतर प्रकृती बिघडल्याचा खुलासा
उपचारादरम्यान तिघांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी गिरीश सुभाष पवार (42, रा. गौरखेडा, ता. चांदूर रेल्वे) याने तयार केलेली दारू प्राशन केल्याचे सांगितले. दारू प्यायल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि उलट्या तसेच इतर गंभीर आरोग्य समस्या सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आरोपीच्या ठिकाणी छापेमारी केली. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात साहित्य आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे समजते.
बेकायदेशीर दारू निर्मितीचा आरोप
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी गिरीश पवार हा कोणताही वैध परवाना अथवा शासकीय परवानगी नसताना बेकायदेशीररीत्या गावठी दारू तयार करून तिची विक्री आणि साठवणूक करत होता. या कृत्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीविताला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या बेकायदेशीर दारूमध्ये विषारी रसायनांची भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूचाही धोका संभवतो.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
चांदूर रेल्वे पोलिसांनी गिरीश सुभाष पवार याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास चांदूर रेल्वे पोलीस करत असून विषारी दारू निर्मितीच्या साखळीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी