लातूर जिल्ह्यातील दोन अपघातांत दोघांचा मृत्यू; पोलिसांचे हेल्मेट वापरण्याचे आवाहन
लातूर, 02 जून, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात घडलेल्या दोन स्वतंत्र दुचाकी अपघातांमध्ये दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला असून या घटनांमुळे वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. दोन्ही प्रकरणांत हेल्मेटचा योग्य वापर झाला नसल्
अपघात


लातूर, 02 जून, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात घडलेल्या दोन स्वतंत्र दुचाकी अपघातांमध्ये दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला असून या घटनांमुळे वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. दोन्ही प्रकरणांत हेल्मेटचा योग्य वापर झाला नसल्याचे तपासात समोर आले असून, वेळेवर हेल्मेट परिधान केले असते तर मृत्यू टाळता आला असता, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलाकडून रस्ते सुरक्षा व अपघात प्रतिबंधासाठी सातत्याने जनजागृती मोहिमा राबविल्या जात असल्या तरी अनेक वाहनचालक सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समोर येत आहे.

रेणापूर तालुक्यातील अपघातात व्यक्तीचा मृत्यू

रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरूनगर तांडा परिसरात झालेल्या अपघातात रामेश्वर अकुंश चीलरगे (रा. तत्तापूर, ता. रेणापूर) यांचा मृत्यू झाला. ते दुचाकीवरून प्रवास करीत असताना पाठीमागून आलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे धडक दिल्याने हा अपघात घडला. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात त्यांच्या जवळ हेल्मेट असल्याचे आढळून आले. मात्र ते डोक्यावर परिधान न करता वाहनाला अडकवून ठेवण्यात आले होते. अपघाताच्या वेळी हेल्मेट वापरले असते तर डोक्याला झालेली गंभीर दुखापत टाळता आली असती, असे पोलिसांनी नमूद केले आहे.

औसा तालुक्यातील अपघातात तरुणाचा मृत्यू

दुसरी घटना भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मारुती एकनाथ सूरवसे (वय ३२, रा. शिवली, ता. औसा) हे दुचाकीवरून जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर पडले. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

तपासादरम्यान त्यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डोक्याला झालेला मार जीवघेणा ठरला. हेल्मेटचा वापर केला असता गंभीर दुखापतीची तीव्रता कमी झाली असती, असे पोलिसांनी सांगितले.

वाहतूक सुरक्षिततेसाठी पोलिसांची जनजागृती

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वाहतूक सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, महामार्ग तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हेल्मेट व सीटबेल्ट वापराबाबत जनजागृती केली जात आहे.

या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, हेल्मेट जवळ बाळगणे पुरेसे नसून ते योग्य पद्धतीने डोक्यावर बांधणे आवश्यक आहे. तसेच चारचाकी वाहनांमध्ये चालकासह सर्व प्रवाशांनी सीटबेल्टचा वापर करावा.

पोलीस प्रशासनाने दुचाकीस्वारांना आयएसआय मानांकित हेल्मेट वापरणे, वेगमर्यादेचे पालन करणे, मोबाईलवर बोलत वाहन न चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे टाळणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

हेल्मेट आणि सीटबेल्ट हा पर्याय नसून जीवनरक्षक उपाय आहे. काही क्षणांचा निष्काळजीपणा आयुष्यभराचे दुःख देऊ शकतो, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande