सोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : पुणे आयुक्त सूर्यवंशी
पुणे, 02 जून, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या ‘जनगणना २०२७’च्या घरसूचीकरण व घरगणना सर्वेक्षणासंदर्भात सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्याने नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आ
सोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : पुणे आयुक्त सूर्यवंशी


पुणे, 02 जून, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या ‘जनगणना २०२७’च्या घरसूचीकरण व घरगणना सर्वेक्षणासंदर्भात सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्याने नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीने राबविली जात असून, कोणत्याही खोट्या माहितीस बळी पडू नये, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर जनगणना प्रक्रियेबाबत विविध प्रकारची अप्रमाणित माहिती आणि खोटी संकेतस्थळे प्रसारित होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिकृत प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्या माध्यमातूनच जनगणनेचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत कोणत्याही कागदी फॉर्मचा वापर न करता मोबाईलवरील अधिकृत ‘एचएलओ ॲप ’द्वारे ऑनलाइन स्वरूपात माहिती नोंदविली जात असल्याचे शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

महापालिकेच्या माहितीनुसार, ‘जनगणना २०२७’च्या पहिल्या टप्प्यातील घरसूचीकरण व घरगणनेच्या प्रत्यक्ष कामास १६ मे २०२६ पासून सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया १४ जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. एचएलओ ॲपच्या माध्यमातून घरांचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात येत असून, ही प्रक्रिया सुरक्षित, अचूक आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात राबविली जात असल्याचेही शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी नमूद केले.

प्रशासनाने नागरिकांना खोट्या संकेतस्थळांपासून आणि सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अचूक जनगणना ही शहर विकासाची भक्कम पायाभरणी असून, शाळा, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर नागरी सेवांचे नियोजन अचूक माहितीच्या आधारेच प्रभावीपणे करता येते, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

जनगणना अधिकारी केवळ आवश्यक माहिती नोंदवतात. ते कोणतेही आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा इतर सरकारी कागदपत्र, बँक तपशील अथवा मोबाईल ओटीपी मागत नाहीत. नागरिकांनी दिलेली सर्व माहिती सुरक्षित आणि गोपनीय राखली जाते. त्यामुळे जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करून शहर विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका:

सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहिती, अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी केवळ अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांनाच सहकार्य करावे. संपूर्ण जनगणना प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात ‘एचएलओ ॲप ’च्या माध्यमातून राबविली जात असून नागरिकांनी विश्वासाने आणि जबाबदारीने आपला सहभाग नोंदवावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande