
घरबसल्या मिळणार पशुवैद्यकीय सल्ला
व्हिडिओ कन्सल्टेशन आणि शासकीय योजनांची माहिती
रायगड, 2 जून (हिं.स.) : महाराष्ट्रातील पशुपालक आणि शेतकरी बांधवांना तात्काळ, सुलभ आणि डिजिटल पद्धतीने पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (BFIL), इंडसइंड बँक आणि राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या पशुधनाशी संबंधित विविध सेवा आणि तज्ज्ञांचा सल्ला मिळणार आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षांपासून ‘1962’ या टोल-फ्री हेल्पलाइन आणि मोबाईल व्हेटर्नरी युनिट्सच्या माध्यमातून ग्रामीण तसेच दुर्गम भागांमध्ये पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. या कालावधीत 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून पशुधनाच्या आरोग्य व्यवस्थापनाला मोठा आधार मिळाला आहे.
या यशस्वी उपक्रमाला अधिक प्रभावी डिजिटल स्वरूप देण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी +91 9063142299 या क्रमांकावर Hi असा संदेश पाठवू शकतात किंवा उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करू शकतात. या माध्यमातून पशुधनाचे आजार, उपचार, लसीकरण, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना आणि इतर शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
या प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना चॅट, ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी थेट संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच टेलिकन्सल्टेशन, पशुवैद्यकीय सेवा मार्गदर्शिका, शासकीय योजनांची माहिती आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) यांचाही समावेश करण्यात आला आहे.
ऑक्टोबर 2025 ते मे 2026 या कालावधीत 615 शेतकऱ्यांनी या चॅटबॉट सेवेचा वापर केला असून 201 व्हिडिओ कन्सल्टेशन यशस्वीरित्या पार पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचत असून पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळत आहे.
पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना तातडीच्या आणि गुणवत्तापूर्ण पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले असून राज्यातील सर्व पशुपालक आणि शेतकरी बांधवांनी 1962 कॉलसेंटर तसेच नव्या व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)