
सोलापूर, 02 जून, (हिं.स.) - विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. महाविकास आघाडीतील विसंवाद आणि महायुतीतील बंडखोरी उघडपणे समोर आल्याने निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे करमाळा येथील आमदार नारायण पाटील उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. दुसरीकडे महायुतीतील शिवसेनेच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे आणि माजी आमदार शहाजी पाटील हेही भाजपच्या व्यासपीठावर दिसले. महायुतीत अंतर्गत नाराजीही समोर आली आहे. मोहोळचे शिवसेना नगरसेवक रमेश बारसकर आणि पंढरपूरचे महेश साठे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीसमोर नवे आव्हान उभे केले आहे.
जिल्ह्यातील शिवसेनेत दोन गट स्पष्टपणे दिसून येत असून, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या समर्थकांनी महेश साठे यांच्या माध्यमातून स्वतंत्र भूमिका घेतल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतही एकसंघतेचा अभाव दिसून आला. आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर काँग्रेसने आदित्य फत्तेपूरकर यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि जीवन जानकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी संबंधित कुर्डुवाडीचे धनंजय डिकोळे आणि बार्शीचे नागेश अक्कलकोटे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्येच्या आधारावर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे स्पष्ट बहुमत असल्याचे मानले जात आहे. मात्र दोन्ही आघाड्यांतील अंतर्गत नाराजी आणि अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या यामुळे निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. आता ४ जून रोजी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर प्रत्यक्ष मैदानात कोण-कोण राहणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड