परभणीत ‘युवा जल दिंडी 2026’ अभियानातून जलसंवर्धन जनजागृती
युवकांकडून गावोगावी पाणी बचत व भूजल संवर्धनाचा संदेश परभणी, 2 जून (हिं.स.) : केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा जल दिंडी 2026’ अभियानाचे आयोजन कर
युवकांच्या सहभागातून जलसंवर्धन  जनजागृतीसाठी युवा जल दिंडी अभियान


युवकांकडून गावोगावी पाणी बचत व भूजल संवर्धनाचा संदेश

परभणी, 2 जून (हिं.स.) : केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा जल दिंडी 2026’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत युवकांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर पेठे येथे हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली.

या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, पावसाच्या पाण्याचे संधारण, भूजल पुनर्भरण तसेच पर्यावरण संरक्षण यावर भर देण्यात येत आहे.

कार्यक्रमात जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, पोलीस पाटील ज्ञानोबा काटकर, दूरदर्शन व आकाशवाणी प्रतिनिधी सुदर्शन चापके, ज्येष्ठ नागरिक शेषराव चापके, दादाराव चापके, रयत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे गजानन सुरवासे आणि रिलायन्स फाउंडेशनचे भरत शिंदे उपस्थित होते.

भूजल पुनर्भरण आणि जलस्रोतांचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विहिरी, बोअरवेल, शेततळी, तलाव, ओढे व नद्यांचे संवर्धन केल्यास पाणीटंचाईवर मात करता येऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

तसेच “जल हेच जीवन” आणि “प्रत्येक थेंब अमूल्य आहे” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जात आहे.

पाणी फाउंडेशनच्या नारी शक्ती महिला शेतकरी गट आणि युवकांनी या जलदिंडीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली तसेच जलसर्वेक्षण करून ऑनलाइन माहिती संकलित केली.

या अभियानातून युवकांना जल व्यवस्थापनात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande