
मुंबई, 02 जून (हिं.स.)। सुसंस्कृत आणि सभ्य महाराष्ट्रात विष कालवण्याचे आणि हिंदुत्ववाद्यांमध्ये फूट पाडण्याचे काम संजय राऊत यांनी केले. भाजपा सर्वांना सोबत घेऊन विकासाचे अमृत जनतेपर्यंत पोहोचवते. विषवल्ली ठरवत जनतेने तुम्हाला नाकारले आणि विकासाचे अमृत स्वीकारले आहे. भारताचा अमृतकाळ हा भाजपाच्या काळात सुरू झाला, तर संजय राऊतांच्या काळात विषकाळ सुरू आहे. हा विषकाळ तुमच्या पक्षाला गिळंकृत करूनच संपणार आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी टीकेची झोड उठवली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते.
अब्दुल सत्तार नेमके काय म्हणाले, याचे उत्तर महायुती म्हणून आम्ही निश्चितपणे देऊ. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत केला जाईल आणि अब्दुल सत्तार यांची काही नाराजी असेल तर ती दूर केली जाईल. परंतु अब्दुल सत्तार यांच्या नावाखाली विष पेरण्याचे काम संजय राऊतांनी करू नये, असे सुनावत बन म्हणाले, उलट विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या निवडणुकीबाबत ‘मला काहीही माहिती नाही, मला वेगळे काम आहे’, असे ते म्हणाले, कारण पक्षात कोणताही निर्णय घेतला जात असेल तर आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांना त्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचे काम करतात. त्याच रागापोटी संजय राऊत काल शिर्डीला पोहोचले आणि साईबाबांचे दर्शन घेऊन श्रद्धा आणि सबुरी मिळवण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांना श्रद्धा आणि सबुरीची बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना साईबाबांना आपण करत आहोत.
हे सरकार उद्योगधार्जिणे म्हणता, मग उद्योगपतींच्या लग्नात स्टेजवर डान्स करणारे कोण होते? उद्योगपतींना रेड कार्पेट टाकून, मोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करणारे कोण होते? आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुम्हाला 50 हजार रुपये देतो अशा भूलथापा देणारे मुख्यमंत्री कोण होते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यातील दमडी, फुटकी कवडीही आम्हाला मिळाली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करणारे सरकार हे उद्धव ठाकरेंचे होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत असताना तुम्ही मर्सिडीज गाडीत बसून काजू-बदाम खाण्यात मग्न होता. ही तुमची शेतकऱ्यांप्रती संवेदना आहे का? शेतकऱ्यांवर अत्याचार करणे, शेतकऱ्यांवर अन्याय करणे हेच तुमचे धोरण आहे. तुम्हाला ऊस जमिनीवर येतो का जमिनीखाली येतो हेही माहिती नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही न बोललेलेच बरे. देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले. आणि राहिला प्रश्न तुमच्या पक्षात कोण येणार याचा, तर तुमचे आता नऊ खासदार निवडून आले आहेत, त्यातील अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. शिर्डी दौऱ्यावर तुम्ही गेला होतात तेव्हा तुमच्यासोबत एकही खासदार नव्हता याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही बन यांनी संजय राऊत यांना दिला.
बन पुढे म्हणाले, राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची कितीही स्वप्ने संजय राऊत यांनी पाहिली तरी ते ''मुंगेरीलाल के हसीन सपने'' सारखेच होईल. संजय राऊत यांची स्वतःची इच्छा आहे की राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आणि स्वतः गृहमंत्री व्हायचे. पण महाराष्ट्रातील आणि देशातील जनता काँग्रेसला ओळखून आहे. राहुल गांधींचे काळे कारनामे देशातील जनतेने पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमचे महाविकास आघाडीचे सरकारही महाराष्ट्रात येणार नाही. कारण अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना कशा पद्धतीने महाराष्ट्राला तुम्ही लुटले हेही जनतेने पाहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर