वर्षा पटणे यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह; प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश
सोलापूर, 02 जून (हिं.स.)। दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा सोमनाथ पटणे (उर्फ वर्षा शिवाजी कोनाळे) यांच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जात प्रमाणपत्रासंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. धाराशिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळ
hgf


सोलापूर, 02 जून (हिं.स.)। दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा सोमनाथ पटणे (उर्फ वर्षा शिवाजी कोनाळे) यांच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जात प्रमाणपत्रासंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. धाराशिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरवत ते रद्द करण्याबाबत कारवाई केल्याची माहिती समोर आली असून प्रमाणपत्र जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे समजते. होटगी स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुळे यांनी या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर समितीने प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेत विविध कागदपत्रे, शासकीय अभिलेख आणि उपलब्ध नोंदींची छाननी केली. समितीसमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, निवडणूक अर्जासोबत वर्षा शिवाजी कोनाळे (मूळ रा. फणेपूर, ता. उमरगा) यांनी राज्य शासनाच्या ओबीसी यादीतील अनुक्रमांक १९० वरील ‘वाणी’ जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रकरणी समितीने दोन वेळा सुनावणी निश्चित केली होती. मात्र दोन्ही वेळा संबंधितांकडून हजेरी लावण्यात आली नसल्याची नोंद असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. चौकशीदरम्यान प्रमाणपत्रावरील डिजिटल स्वाक्षरी, कार्यालयीन शिक्का तसेच इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात आली. यासंदर्भात संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झाले नसल्याचे लेखी स्वरूपात कळविल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच प्रमाणपत्रावरील बारकोड तपासणीतही संबंधित माहिती उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आल्याचे समजते. या सर्व बाबींचा विचार करून जात पडताळणी समितीने संबंधित प्रमाणपत्राबाबत प्रतिकूल निर्णय दिल्याचे सांगितले जात आहे. यानंतरची प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणावर संबंधित उपसभापती किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande