
ठाणे, 02 जून, (हिं.स.)। केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांचा थेट लाभ (DBT) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'AgriStack' अंतर्गत 'फार्मर आयडी' (शेतकरी ओळखपत्र) तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर तालुक्यात रविवार, दि.31 मे 2026 रोजी वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे (कॅम्प) आयोजन करण्यात आले होते. कृषी आयुक्तालय, पुणे येथील AgriStack चे संचालक श्री. अंकुश माने यांनी या शिबिरांना प्रत्यक्ष भेट देऊन वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना त्वरित फार्मर आयडी नोंदणी करण्याचे आवाहन केले.
'AgriStack' हा शेतकऱ्यांचा एक अद्ययावत डिजिटल डेटाबेस (माहितीकोश) आहे. यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील आणि पिकांची नोंद एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ यापुढील काळात याच फार्मर आयडीद्वारे दिला जाणार आहे. तसेच 'पीएम किसान' (PM-KISAN) योजनेतील पात्र शेतकऱ्यांना हा आयडी प्राप्त केल्याशिवाय योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार नाही.
यापूर्वी वनपट्टेधारक शेतकऱ्यांची AgriStack अंतर्गत नोंदणी होत नसल्यामुळे, हे शेतकरी महसूल व कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत होते. मात्र, आता 'आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था' (TRTI), पुणे यांच्या स्तरावरून पडताळणी झालेल्या वनपट्टेधारक शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील तहसीलदार कार्यालय, तसेच शहापूर तालुक्यातील दुग व मॉडूळवाडी (वेहलोळी) या गावांमध्ये विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. संचालक श्री. अंकुश माने यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच नोंदणी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींचे व शंकांचे निरसन करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरांमध्ये जवळपास ८० ते १०० वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी आपली यशस्वी नोंदणी करून घेतली.
या मोहिमेदरम्यान विभागीय कृषी सहसंचालक (ठाणे) शिवाजी आमले, अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (ठाणे) रामेश्वर पाचे, उपविभागीय अधिकारी (कल्याण) आशिष बालगुडे, तालुका कृषी अधिकारी (मुरबाड) संदीप केणे, तालुका कृषी अधिकारी (शहापूर) कुमार जाधव उपस्थित होते.
तसेच मंडळ कृषी अधिकारी भगवान पथारे, टी.आर.टी.आय. समन्वयक नरेंद्र लाटे व श्री. राकेश पाटील, उपकृषी अधिकारी, संबंधित गावांचे सहाय्यक कृषी अधिकारी, महसूल विभागाचे मुरबाड सजेचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि सीएससी (CSC) केंद्रांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर