
लंडन , 22 जून (हिं.स.)। युरोपमधील बहुतांश भागांमध्ये रविवारी उष्णतेच्या तीव्र लाटेचा (हीटवेव्ह) प्रभाव दिसून आला. इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. यामुळे अनेक शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उष्णतेचा परिणाम वाहतूक, पर्यटन आणि वन्यजीवांवरही दिसू लागला आहे.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की सहारा वाळवंटातून उत्तरेकडे सरकणाऱ्या गरम वाऱ्यामुळे आणि आफ्रिकन अँटीसायक्लोन नावाच्या उच्च दाब प्रणालीमुळे पश्चिम आणि मध्य युरोपवर हीट डोम तयार झाला आहे. यामुळे गरम हवा अडकून राहिली आहे आणि तापमान सतत वाढत आहे.इटलीमध्ये अनेक दिवसांपासून तापमान 35°C च्या वर आहे. यामुळे बोलोन्या, फ्लोरेंस, मिलान आणि ट्यूरिनसह 8 शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
स्पेनची हवामान संस्था एईएमईटी ने देशाच्या अनेक भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. स्पेनमध्ये रविवारी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अधिकाऱ्यांनी नागरिकांना दीर्घकाळ उन्हात न राहण्याचा सल्ला दिला असून, जंगलातील आगीचा वाढता धोका लक्षात घेता विशेष इशाराही जारी करण्यात आला आहे.
रविवारी फ्रान्सच्या सुमारे एकतृतीयांश भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला. काही भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये तीव्र उष्णतेचा परिणाम रेल्वे नेटवर्कवर होत आहे. राष्ट्रीय रेल्वे ऑपरेटर एसएनसीएफ नुसार जास्त तापमानामुळे विजेच्या ओव्हरहेड लाईन्स आणि रेल्वे रुळांना नुकसान पोहोचण्याचा धोका वाढला आहे. खबरदारी म्हणून प्रमुख मार्गांवर सोमवारपर्यंत 71 इंटरसिटी ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.दरम्यान, फ्रान्सने जंगलातील आगीचा धोका लक्षात घेऊन आपत्कालीन सेवा आणि सैन्याला सतर्कतेवर ठेवले आहे. काही मैदानी क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत.जर्मनीमध्ये तापमान 38°C पर्यंत पोहोचले आहे. हवामान विभाग डीडब्ल्यूडी ने बर्लिनसह पूर्वेकडील प्रदेशांमध्ये तीव्र वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode