
तेहरान, 23 जून (हिं.स.)। जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणने पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या चर्चेनंतर इराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुझ आता युद्धापूर्वीच्या स्थितीत परत जाणार नाही आणि त्यावरील नियंत्रण तेहरानकडेच राहील. इराणचे मुख्य वाटाघाटी प्रतिनिधी मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचे प्रशासन तेहरानकडूनच चालवले जाईल, असे म्हटले आहे
इराणच्या सरकारी माध्यमांनी मंगळवारी ही माहिती दिली.
इराणच्या सरकारी वृत्तानुसार, चर्चेवरून परतल्यानंतर गालिबाफ म्हणाले की, होर्मुझ सामुद्रधुनी युद्धापूर्वीच्या स्थितीत कधीही परत जाणार नाही आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार तिचे प्रशासन इराणकडूनच केले जाईल. गालिबाफ यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, स्वित्झर्लंडमधील आलिशान बर्गेनस्टॉक रिसॉर्टमध्ये झालेल्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहेत. ते म्हणाले, “माझ्या मते या दौऱ्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत. विशेषतः होर्मुझच्या प्रश्नावर, लेबनॉनशी संबंधित चर्चांमध्ये, तेलावरील निर्बंधांमध्ये शिथिलता आणि गोठवून ठेवलेला निधी मुक्त करण्याच्या मुद्द्यांवर प्रगती झाली आहे. चर्चेनंतर सोमवारी अमेरिकेने इराणी तेलावरील काही निर्बंध तात्पुरते शिथिल केले. या कराराअंतर्गत इराणला काही अमेरिकी निर्बंधांपासून दिलासा मिळणार असून, जप्त करण्यात आलेली काही मालमत्ताही मुक्त करण्यात येणार आहे.
व्हिडीओमध्ये गालिबाफ म्हणाले की, आमच्या मते ही प्रक्रिया अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि पुढेही प्रयत्न सुरू ठेवण्याची गरज आहे. इराणने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, त्यांचा अमेरिकेवर विश्वास नाही. गालिबाफ म्हणाले की, आम्ही कधीही अमेरिकनांवर विश्वास ठेवला नाही. आजही त्यांच्यावर आमचा विश्वास नाही आणि भविष्यातही त्यांच्याबाबत अविश्वास कायम ठेवणेच योग्य ठरेल. गालिबाफ यांनी ओमानचाही दौरा केला. ओमान आणि इराण या दोन्ही देशांच्या सीमा होर्मुझ सामुद्रधुनीला लागून आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद केला होता. मात्र, गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू करण्यावर सहमती झाल्यानंतर तो पुन्हा खुला करण्यात आला.
तेहरानने शनिवारी जाहीर केले की, लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आली होती. त्यानंतर इराण आणि अमेरिका यांनी कोणताही गैरसमज किंवा अनपेक्षित घटना टाळण्यासाठी तसेच या मार्गावरून जाणाऱ्या व्यापारी जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी विशेष संपर्क यंत्रणा (कम्युनिकेशन सिस्टीम) उभारण्यावर सहमती दर्शवली.जहाजांच्या हालचालींवर नजर ठेवणाऱ्या कंपन्यांच्या माहितीनुसार, सोमवारी होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक सुरळीत सुरू होती. अमेरिका आणि इराण यांनी युद्ध समाप्तीसाठी चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मार्गावरील जहाजांची वर्दळ पूर्वीपेक्षा अधिक वेगाने सुरू असल्याचेही दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode