
ढाका, 23 जून (हिं.स.)।बांगलादेशातील बंदी घालण्यात आलेल्या आवामी लीगने आपल्या ७७व्या स्थापना दिनानिमित्त शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी असतानाही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, मोर्चे काढले आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी राजधानी ढाका तसेच इतर भागांतून डझनभर कार्यकर्त्यांना अटक केली. प्रशासनाने बंदीचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा केला आहे.
२३ जून १९४९ रोजी स्थापन झालेला आवामी लीग हा बांगलादेशातील सर्वात जुना राजकीय पक्ष मानला जातो. १९७१ च्या मुक्तिसंग्रामाचे नेतृत्वही याच पक्षाने केले होते. मात्र, ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने पक्षावर बंदी घातली होती. त्यानंतर पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि संसदेनाही या निर्णयाला पाठिंबा दिला. अशा परिस्थितीत स्थापना दिनानिमित्त पक्षाने रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय तणाव अधिक वाढला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे कार्यकर्ते सुरक्षा आदेशांकडे दुर्लक्ष करून मोर्चे काढण्याचा आणि सार्वजनिक सभा घेण्याचा प्रयत्न करत होते. ढाका पोलिसांनी केवळ राजधानीतून २६ कार्यकर्त्यांना अटक केल्याचे सांगितले, तर देशातील इतर भागांतूनही अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ढाका महानगर पोलिस आयुक्त मोसलेह उद्दीन अहमद यांनी सांगितले की, पोलिसांनी आतापर्यंत सर्व मोर्चे आणि रॅलींचे प्रयत्न हाणून पाडले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुढेही कारवाई सुरू राहणार आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था आणि सरकारी बंदी असूनही आवामी लीगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले, ज्यामध्ये कार्यकर्ते पक्षाचे झेंडे आणि बॅनर घेऊन रस्त्यांवर मोर्चा काढताना दिसत आहेत. पक्षाने आपल्या समर्थकांना डिजिटल चर्चासत्रे, पोस्टर मोहीम आणि ध्वजारोहण करून स्थापना दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते.स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला भारतात वास्तव्यास असलेल्या शेख हसीना यांनी सोशल मीडियावर संदेश देत म्हटले, “आमचा जन्म पराभवासाठी झालेला नाही.” पक्षाने आपण पूर्वीपेक्षा दहापट अधिक ताकदीने पुनरागमन करू, असाही दावा केला आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तेवरून हटवल्यानंतर शेख हसीना भारतात राहत आहेत. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने विद्यार्थी आंदोलन दडपल्याप्रकरणी त्यांना अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच देशातील मुख्य प्रवाहातील माध्यमांना हसीना यांची विधाने आणि आवामी लीगच्या हालचालींचे प्रसारण करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्रादेशिक माध्यमांद्वारे हसीना या न्यायव्यवस्थेचा राजकीय वापर होत असल्याचा आणि लोकशाही वातावरण कमकुवत केल्याचा आरोप सरकारवर सातत्याने करत आहेत.
स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अशांततेची शक्यता लक्षात घेऊन सरकारने ढाकासह सहा जिल्ह्यांत सैन्य आणि सीमा सुरक्षा दल बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) तैनात केले आहे. ही तैनाती ३० जूनपर्यंत कायम राहणार आहे.शेख हसीना यांचे गृहनगर आणि आवामी लीगचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोपालगंज येथेही अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. अलीकडेच आवामी लीगच्या दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूनंतर तणाव आणखी वाढला असून, अनेक भागांत निदर्शने आणि रस्ते रोकोच्या घटना घडल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode