कतारमधील गॅस प्रकल्प स्फोटात १२ भारतीयांसह १३ जणांचा मृत्यू
दोहा , 23 जून (हिं.स.)। कतारमधील रास लाफान येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या एलएनजी प्रकल्पात रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १२ भारतीयांसह १३ जणांचा मृत्यू झाला, तर ६६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर काही जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
कतारमधील गॅस प्रकल्प स्फोटात १२ भारतीयांसह १३ जणांचा मृत्यू


दोहा , 23 जून (हिं.स.)। कतारमधील रास लाफान येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या एलएनजी प्रकल्पात रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १२ भारतीयांसह १३ जणांचा मृत्यू झाला, तर ६६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर काही जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. स्फोटानंतर पश्चिम आशियात पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे.

इराण युद्धादरम्यान क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले होते. रविवारी प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक हा स्फोट झाला.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रविवारी सायंकाळी बारजान गॅस पुरवठा प्रकल्पात हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की परिसरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर त्याचा आवाज सुमारे ७० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. घटनेनंतर कतारच्या गृह मंत्रालयाने आपत्कालीन प्रतिसाद पथके तातडीने घटनास्थळी तैनात केली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती दिली.

कतार एनर्जी या सरकारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे प्रकल्पाच्या मुख्य संरचनेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. या प्रकल्पातून पाइपलाइनद्वारे स्थानिक उद्योग तसेच कतारच्या वीज निर्मिती क्षेत्राला गॅसचा पुरवठा केला जातो. याशिवाय, देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेसाठी इथेन, कंडेन्सेट, द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) आणि सल्फरचे उत्पादनही येथे केले जाते.

दरम्यान, कतारमधील भारतीय दूतावासाने निवेदन जारी करून या कठीण प्रसंगी संपूर्ण भारतीय समुदाय कतारच्या नागरिकांसोबत असल्याचे म्हटले आहे. दूतावासाने मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडीही जाहीर करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande