
लंडन, 23 जून (हिं.स.)। युरोपमध्ये उष्णतेची तीव्र लाट पसरली असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.या उष्णेतमुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
स्पेनमधील सर्वात थंड मानल्या जाणाऱ्या सान सेबास्टियन परिसरात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. फ्रान्समधील निम्म्याहून अधिक भागांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच आठवड्यात फ्रान्समध्ये उष्माघातामुळे १८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. ही दोन्ही मुले कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फ्रान्स सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली असून, देशातील बहुतांश शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. ब्रिटनमधील वेस्ट मिडलंड्स, साउथ ईस्ट, साउथ वेस्ट, लंडन आणि ईस्ट ऑफ इंग्लंड या भागांमध्ये आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या उष्णतेमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ब्रिटनमधील अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
बेल्जियमच्या हवामान विभागाने ही उष्णतेची लाट आणखी एक आठवडा कायम राहू शकते, असा इशारा दिला असून तापमान विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इटलीतील १२ शहरांमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर फ्रान्समध्ये वाढत्या तापमानामुळे काही अणुभट्ट्या बंद करण्याची वेळ आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode