
मनिला , 22 जून (हिं.स.)।मध्य फिलिपिन्समधील टाकलोबान शहरातील एका शाळेत सोमवारी सकाळी अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली.या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बरांगाय सॅन जोस येथील एका शाळेच्या परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बरांगाय सॅन जोस येथील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
गोळीबारामागील नेमके कारण काय होते आणि अशी हिंसक घटना घडण्यामागे कोणता हेतू होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या मृत आणि जखमींची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
टाकलोबान सिटी पोलिस कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यामागील उद्देश आणि घटनेची नेमकी कारणे शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन संशयिताची कसून चौकशी केली जात असून, फरार असलेल्या दुसऱ्या संशयिताच्या शोधासाठी पोलिसांकडून सातत्याने छापेमारी केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode