युक्रेनचा मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला; चार विमानतळे तात्पुरती बंद
मॉस्को, 22 जून (हिं.स.) : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या सीमापार हल्ल्यांच्या मालिकेत सोमवारी मॉस्कोला लक्ष्य करत युक्रेनकडून डझनावारी ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्
युक्रेनचा मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला; चार विमानतळे तात्पुरती बंद


मॉस्को, 22 जून (हिं.स.) : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या सीमापार हल्ल्यांच्या मालिकेत सोमवारी मॉस्कोला लक्ष्य करत युक्रेनकडून डझनावारी ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्तव मॉस्कोतील चार विमानतळे तात्पुरती बंद करण्यात आली असून विमानसेवाही स्थगित करण्यात आली.

मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने तत्परता दाखवत एकूण ५९ ड्रोन पाडले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली.” रशियन अधिकाऱ्यांच्या मते, हा एक मोठा ड्रोन हल्ला होता. मात्र, रशियन हवाई दलाने वेळेवर कारवाई करून संभाव्य मोठा धोका टाळला.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी रशियाने युक्रेनच्या दक्षिणेकडील ओडेसा प्रदेशावर इस्कंदर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले.ओडेसा जिल्ह्यातील एका कृषी प्रकल्प परिसरात स्फोटामुळे वाहने आणि इंधन साठवण टाक्यांना आग लागली. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी आपत्कालीन सेवा पथके तैनात करण्यात आली असून हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande