
वॉशिंग्टन , 23 जून (हिं.स.) : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी इस्लामाबादबद्दल प्रेम व्यक्त करणारी विधाने केल्यानंतर, रिपब्लिकन पक्षाच्या दोन सिनेटरांनी कतार आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या इतिहासाकडे लक्ष वेधले आहे.
स्वित्झर्लंडमध्ये जेडी व्हान्स यांनी केलेल्या “आम्हाला पाकिस्तानवर प्रेम आहे” या वक्तव्यानंतर फ्लोरिडाचे सिनेटर रिक स्कॉटयांची ही प्रतिक्रिया आली. व्हान्स तेथे पाकिस्तान आणि कतारच्या नेत्यांसोबत इराणबरोबरच्या शांतता कराराच्या तांत्रिक बाबींवर चर्चा करत होते. स्कॉट यांनी सोमवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले, “आतापर्यंत सर्वांनाच हे स्पष्ट झाले पाहिजे की आपले खरे मित्र कोण आहेत. कतार आणि पाकिस्तानचा दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा दीर्घ इतिहास आहे आणि सध्या ते अर्थपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यापेक्षा इराणच्या दशकांपासून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना चालना देण्यात अधिक रस दाखवत आहेत.”
स्कॉट म्हणाले, “अजूनही असा करार होण्याची शक्यता आहे, जो सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, सर्वांनी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की इराणने या प्रक्रियेचा वापर करून अण्वस्त्रे विकसित करण्याची कोणतीही शक्यता स्वीकारली जाणार नाही.”
दरम्यान, मोंटानाचे सिनेटर टिम शीही यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनला आश्रय देण्यात पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख केला. ते म्हणाले, “पाकिस्तानने जवळपास एक दशक ओसामा बिन लादेनला लपवून ठेवले होते, हे आपण विसरता कामा नये. तसेच त्यांनी आयएसआयच्या माध्यमातून अयातुल्ला शासनाला आर्थिक मदत पुरवली.” ते पुढे म्हणाले की, जर पाकिस्तान आणि कतार शांतता चर्चेत सहभागी असतील, तर अमेरिकेने संयुक्त अरब अमिराती, इस्रायल आणि सौदी अरेबियालाही या चर्चेत सामील करून घ्यावे. त्यांच्या मते, मध्य पूर्वेत संयुक्त अरब अमिराती, इस्रायल आणि सौदी अरेबिया हेच अमेरिकेचे खरे मित्रदेश आहेत.
मोंटानाच्या या सिनेटरांनी असा आरोपही केला की, कतार अनेक दशकांपासून दहशतवादी संघटनांसाठी मनी लॉन्डरिंगचे काम करत आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानने आयएसआयच्या माध्यमातून आमच्याविरोधातील बंडखोरांना आर्थिक मदत केली आणि ओसामा बिन लादेनला लपवून ठेवले. त्यामुळे ते निष्पक्ष मध्यस्थ म्हणून काम करतील, असे मला वाटत नाही.” ते पुढे म्हणाले, “आपण संयुक्त अरब अमिराती आणि इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे, कारण कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी या प्रदेशात तेच अमेरिकेचे सर्वात महत्त्वाचे आणि अग्रस्थानी असलेले सहकारी राहतील.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode