
कोल्हापूर, 24 जून (हिं.स.)। वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत अचूक व पारदर्शक माहिती मिळावी तसेच ग्राहकांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात यासाठी महावितरणतर्फे जिल्हाभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. स्मार्ट मीटरचे फायदे नागरिकांपर्यंत पाहोचविण्याकरिता मंगळवार (दि.23 रोजी) मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील ३० उपविभागात एकूण 83 ठिकाणी घेण्यात आलेल्या मेळाव्यांचा 2 हजार 122 ग्राहकांनी लाभ घेतला असून ग्राहकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. तसेच स्मार्ट मीटरबाबत शंका असल्यास नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले आहे.
यावेळी कोल्हापूर शहर विभागातील 2 मेळाव्यांमध्ये 12 ग्राहकांनी, कोल्हापूर ग्रामीण 1 विभागातील 40 मेळाव्यांमध्ये 1 हजार 131 ग्राहकांनी, कोल्हापूर ग्रामीण 2 विभागातील मेळाव्यांमध्ये 186 ग्राहकांनी, गडहिंग्लज विभागातील 3 मेळाव्यांमध्ये 68 ग्राहकांनी, इचलकरंजी विभागातील 21 मेळाव्यांमध्ये 600 ग्राहकांनी तर जयसिंगपूर विभागातील 5 मेळाव्यांमध्ये 125 ग्राहकांनी मेळाव्यांचा लाभ घेतला, असे कोल्हापूर मंडलात एकूण 2 हजार 122 वीज ग्राहकांनी मेळाव्यांचा लाभ घेऊन स्मार्ट मीटरबाबत असणाऱ्या शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी वीज ग्राहकांकडून स्मार्ट मीटरच्या माहितीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
मीटरमुळे वीज वापराची माहिती तात्काळ उपलब्ध होते, बिलिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येत आहे. तसेच कर्मचाऱ्यास मीटर रीडिंगसाठी प्रत्यक्ष जागेवर येण्याची गरज भासत नाही. ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवणे सुलभ होत असून ऊर्जा बचतीलाही चालना मिळत आहे. मेळाव्यांमध्ये स्मार्ट मीटरचे फायदे ग्राहकांना पटवून सांगण्यात आले. स्मार्ट मीटरबाबत विविध स्तरावर गैरसमज असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच स्वीकारावी, उर्वरित वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घेण्याचे आवाहन आवाहन महावितरणने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar