मयत कर्जदाराला 'जिवंत' दाखवून न्यायालयाची फसवणूक
* ''शिवकृपा'' पतपेढीचे व्यवस्थापन पोलीस चौकशीच्या फेऱ्यात मुंबई, 24 जून (हिं.स.) - मयत कर्जदाराला कागदोपत्री जिवंत दाखवून शासकीय उपनिबंधक आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी ''शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई''चे अध्यक्ष गोरख चव्हाण आण
शिवकृपा पतपेढी


* 'शिवकृपा' पतपेढीचे व्यवस्थापन पोलीस चौकशीच्या फेऱ्यात

मुंबई, 24 जून (हिं.स.) - मयत कर्जदाराला कागदोपत्री जिवंत दाखवून शासकीय उपनिबंधक आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी 'शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई'चे अध्यक्ष गोरख चव्हाण आणि त्यांचे सहकारी मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. विक्रोळी येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या गंभीर फसवणुकीची दखल घेत याबाबत संबंधित व्यक्तींची पोलीस चौकशी करून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १७५ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक माहितीनुसार, प्रमोद शिरोडकर यांनी शिवकृपा पतपेढीकडून कर्ज घेतले होते. त्यांच्या निधनानंतर पतपेढीने त्यांच्या जीवन विम्याचा 'डेथ क्लेम' (विमा रक्कम) देखील वसूल केला होता. म्हणजेच, कर्जदार मयत असल्याची पूर्ण कल्पना पतपेढी प्रशासनाला होती. मात्र, त्यानंतरही संस्थेचे अध्यक्ष गोरख चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेटे, वरिष्ठ व्यवस्थापक सुदाम जाधव आणि वसुली अधिकारी अशोक फडतरे यांनी संगनमत केले. कर्जदार जिवंत असल्याचे भासवून त्यांनी शासकीय उपनिबंधक सहकारी संस्था आणि महानगर दंडाधिकारी यांच्याकडून बेकायदेशीरपणे वसुलीचे आदेश मिळवले.

या जाचाला कंटाळून मयत कर्जदाराचे वारसदार व तक्रारदार प्रल्हाद शिरोडकर यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वकिलामार्फत दाखल करण्यात आलेल्या फौजदारी याचिकेनंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

माझे वडील मयत झाले आहेत आणि संस्थेने त्यांचा विमा क्लेमही घेतला आहे, हे माहित असूनही केवळ आम्हाला त्रास देण्यासाठी आणि बेकायदेशीर वसुलीसाठी पतपेढीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कागदोपत्री जिवंत दाखवले. हा न्यायालय आणि शासकीय यंत्रणेचा घोर अपमान आहे. आम्हाला दंडाधिकार्‍यांच्या आदेशामुळे न्याय व दिलासा मिळाला आहे.

— प्रल्हाद शिरोडकर (तक्रारदार)

पोलिसांचा तपास सुरू

न्यायालयाच्या आदेशानंतर विक्रोळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. आरोपींनी संगनमत करून फसवणूक, विश्वासघात आणि न्यायालयाचा अवमान केल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने, पतपेढीचे अध्यक्ष गोरख चव्हाण यांच्यासह संपूर्ण व्यवस्थापन आता पोलिसांच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहे. या घोटाळ्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande